राईट अँगल्स
मुसलमान नावाच्या राक्षसाची गोष्ट
राजकारण

मुसलमान नावाच्या राक्षसाची गोष्ट

राजेंद्र साठे  ·  ३० मे २०१७

मुंबई हे देशातले सर्वाधिक कॉस्मॉपॉलिटन शहर म्हणून नावाजले जाते. या शहरात खूप मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. कित्येक पिढ्यांपासून त्यांच्या वस्त्या येथे आहेत. अशा शहरात (किंवा त्याच्या उपनगरात) राहणाऱ्या व एका शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींचे हे उदाहरण आहे. पण ते जवळपास प्रातिनिधिक आहे. अंधेरी-वांद्रे-पवई अशा भागांमध्ये थोडे वेगळे चित्र आढळू शकेल. पण ते अपवाद म्हणूनच. ही हजारो मुले अशा वातावरणात तरुण होणार आहेत. त्यांचा मुस्लिम समाजाशी दुरान्वयाने कोणताही संबंध नाही. तो येऊ नये अशीच जणू कडेकोट व्यवस्था त्यांच्या अवतीभवती आहे.

राजेंद्र साठे

माझी मुलगी मुंबईतील बोरीवली येथील एका शाळेत शिकली. त्या शाळेत तिच्यासोबत गुजराती, मल्याळी, तमीळ, तेलुगू, हिंदी व क्वचित बंगाली अशी विविध भाषिक घरांमधून आलेली मुले होती. पण पहिली ते दहावी या दहा वर्षांच्या काळात एकही मुस्लिम मुलगा किंवा मुलगी तिच्या वर्गात नव्हती. तिच्या वर्गांच्या इतर तुकड्यांमध्येही  कोणीही मुस्लिम नव्हते. तिच्या शाळेचे जाडजूड व रंगीत वार्षिक अहवाल प्रसिध्द होतात. विविध स्पर्धा किंवा नाटकाबिटकांमध्ये भाग घेतलेल्या मुलांची नावे-फोटो त्यात प्रसिध्द होतात. पण मला त्यात कधीही मुस्लिम नाव आढळले नाही. ही शाळा कॉन्वेंट किंवा चर्चद्वारा चालवली जाणारी नव्हती. सीबीएसई अभ्यासक्रमाची होती. ज्यांची बदली देशभर होण्याची शक्यता आहे असे पालक अशा शाळांमध्ये मुलांना घालतात असे ऐकून होतो. पण त्या दहा वर्षांच्या काळात अपवादानेही असा एकाही मुस्लिम नोकरदार या शाळेकडे आलेला दिसला नाही.

मी राहतो त्या एका सोसायटीत 98 फ्लॅट्स आहेत. अशा एकूण सुमारे सात बिल्डिंग्स  आमच्या कॉम्प्लेक्समध्ये आहेत. म्हणजे सहाशे ते सातशे कुटुंबांचे गाव असावे असा आमचा परिसर आहे. आमच्या सोसायटीमध्ये सर्वभाषिक लोक राहतात. पण यात एकही मुस्लिम कुटुंब नाही. इतर सोसायट्यांमध्येही हीच स्थिती आहे. इथे फ्लॅट विकण्याचे व भाड्याने देण्याचे व्यवहार सतत चालत असतात. पण मुसलमानाला फ्लॅट विकायचा नाही वा मुस्लिम भाडेकरू ठेवायचा नाही हा अलिखित नियम आहे. लोक तसे उघडपणे बोलतात. तसा प्रयत्न कोणी केल्यास सोसायटीचे कारभारी त्याच्यावर या ना त्या मार्गाने दबाव आणतात. तुम्ही एजन्ट बरोबर जागा विकत घेण्यासाठी म्हणून मुंबई च्या उपनगरात  फिरलात, तर हा अनुभव हमखास येईल. एखादी सोसायटीचे गुणगान गाताना, ती कशी मोक्याच्या जागी आहे, मार्केट, हायवे, स्टेशन कसे जवळ आहे याच बरोबर – ‘नो एम फॅक्टर’ हा गुण आवर्जून सांगितला जातो. नो एम फॅक्टर म्हणजे इथे कोणीही मुसलमान कुटुंब राहत नाही

माझ्या मुलीचे मित्र-मैत्रिणी अशाच सोसायट्यांमधून राहतात. यातले काही जण तर फक्त गुजरात्यांच्या किंवा फक्त जैनांच्या अशा सोसायट्यांमध्ये राहतात. तिची एक मैत्रीण गौड सारस्वत ब्राह्मणांच्या सोसायटीत राहते. तिथे तर या ब्राह्मणांमधील विशिष्ट मठ मानणाऱ्यांनाच प्रवेश आहे अशी बोलवा आहे.

हे बहुतांश पालक उच्च मध्यमवर्गीय व व्यावसायिक आहेत. त्यांचे विचार हे हिंदुत्ववादाला अनुकूल असावेत असे त्यांच्याशी सहज बोलले तरी लक्षात येते. मुस्लिमांविषयी त्यांची मते काय असतील याचा तर्क करता येऊ शकतो.

या मुलांचे वाचन मर्यादित प्रकारचे आहे. हॅरी पॉटर वगैरे. त्यात मुस्लिम व्यक्तिरेखा येण्याचा प्रश्न येत नाही. माझी मुलगी मराठी वाचते. पण उध्दव शेळके, श्री. दा. पानवलकर, भारत सासणे, हमीद दलवाई या किंवा अशांच्या लेखनातील मुस्लिम पात्रांपर्यंत ती कधीतरी पोचेल की नाही याबाबत मला तरी शंकाच आहे. आणि अशा व्यक्तिरेखा व त्यांचा परिसर सध्या प्रचलित इंग्रजी साहित्यात आहे असे मला वाटत नाही.

ही मुले इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी टीव्ही मालिका पाहतात. पण त्यातल्या कौटुंबिक मालिकांमध्ये चुकूनसुध्दा मुस्लिम पात्र नसते. ऐतिहासिक मालिकांमध्ये मुस्लिम असतात. पण त्यांचे चित्रण खलनायक म्हणूनच असते. त्याविषयी वेगळे कधी तरी बोलायला हवे.

ही मुले, अर्थातच, हिंदी सिनेमे पाहतात. त्यात त्यांचे आवडते हे रॉमकॉम किंवा हलकेफुलके रोमॅंटिक असतात. बहुतेकदा त्यातील पात्रांना आडनाव नसते. आणि त्यांची नावे सिद, राज, करण अशी असतात. ती हिंदू असावीत अशा रीतीने वागतात.

या मुलांना सर्वसामान्य मुस्लिम समाज, कुटुंबे यांची जवळपास काहीही माहिती नाही. त्यांचे राहणे-वागणे-बोलणे, खाणे-पिणे, भाषा, व्यवसाय, सण-समारंभ, धर्म, धार्मिकता याबाबत त्यांच्या डोळ्यापुढे वा कानावर कोणतेही साधेसुधे तपशील येत नाहीत. त्यातल्या त्यात गर्दीमध्ये येता-जाता दिसणाऱ्या बुरख्यातील मुली-महिला आणि मशिदीमधून कानावर पडणारी बांग यातूनच त्यांना मुस्लिमांचे अस्तित्व जाणवत असावे.

मुंबई हे देशातले सर्वाधिक कॉस्मॉपॉलिटन शहर म्हणून नावाजले जाते. या शहरात खूप मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. कित्येक पिढ्यांपासून त्यांच्या वस्त्या येथे आहेत. अशा शहरात (किंवा त्याच्या उपनगरात) राहणाऱ्या व एका शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींचे हे उदाहरण आहे. पण ते जवळपास प्रातिनिधिक आहे. अंधेरी-वांद्रे-पवई अशा भागांमध्ये थोडे वेगळे चित्र आढळू शकेल. पण ते अपवाद म्हणूनच. ही हजारो मुले अशा वातावरणात तरुण होणार आहेत. त्यांचा मुस्लिम समाजाशी दुरान्वयाने कोणताही संबंध नाही. तो येऊ नये अशीच जणू कडेकोट व्यवस्था त्यांच्या अवतीभवती आहे.

आता या कडेकोट बंदोबस्ताच्या विरुध्द बाजूने होणाऱ्या माऱ्याचे चित्र पाहा.

वृत्तपत्रे व टीव्हीच्या बातम्या यामध्ये सदैव काश्मीर आणि पाकिस्तानची चर्चा चालू असते. पाकिस्तान हे शत्रूराष्ट्र आहे हे तर भारतातल्या प्रत्येक मुलाला आपोआप ठाऊक असतेच. मुले थोडी मोठी झाली की त्यांच्यासाठी पाकिस्तानच्या मुसलमान असण्याचा संबंध ठळक होतो.

काश्मिरी लोक मुसलमान आहेत व त्यामुळे ते देशद्रोहीपणा करीत आहेत असे तर आजकाल आपले अनेक टीव्हीवाले आणि काही पेपरवालेही सूचित करतात.

यांच्या जोडीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयसिस किंवा तालिबानी दहशतवाद आला आहे.

या सर्व बातम्या ही मुले बारकाईने वाचता-पाहतात असे नव्हे. त्या त्यांच्यापर्यंत वरवरच पोचत असण्याची शक्यता अधिक. पण त्यामुळेच उलट त्यातील गुंतागुंतीपासून ते लांब असतात. मुसलमान म्हणजे दहशतवाद अशी सोपी समीकरणे रुजायला जमीन तयार होते.

गेल्या दोन वर्षांपासून देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. ते आल्यापासूनचे अनेक विषय हे हिंदू आणि मुस्लिम अशी विभागणी करणारे आहेत. गोहत्या बंद करणे, गोमांसावर बंदी घालणे, धर्मांतराला अटकाव करणे किंवा हिंदूंना पुन्हा धर्मात घेणे, राष्ट्रगीतासाठी उभे राहणे, वंदे मातरम, अयोध्येत राम मंदिर उभारणे, देशात समान नागरी कायदा आणणे, काश्मीरचा वेगळा दर्जा रद्द करणे, मुस्लिम महिलांना तोंडी तलाकपासून वाचवणे इत्यादी…. अशी विषयांची यादी आहे.

हे विषय एकामागून एक आवर्ती पध्दतीने पुन्हापुन्हा येत राहतात. मुसलमान नावाच्या एका गटाच्या नाठाळपणामुळे हे विषय उद्भवले आहेत आणि त्यांना वठणीवर आणणे आवश्यक आहे, असा संदेश त्यामुळे दृढ होतो.

लहान मुलांच्या कार्टूनमध्ये अडाणी, हेकट आणि जाडा असलेला एक खलनायक असतो. उदाहरणार्थ छोटा भीममध्ये कालिया किंवा डोरेमॉनमधला सुन्यो. प्रत्येक भागात त्याला शिक्षा करणे आवश्यक ठरते. आपल्या देशातले राजकारण ही एक राजकीय महामालिकाच चालू आहे. त्यातल्या प्रत्येक एपिसोडमध्ये कारण बदलत राहते पण खलनायक एकच राहतो – मुसलमान. त्याला कोंडीत पकडून शिक्षा आवश्यक ठरते.

मुलांपर्यंत यातील सर्वच तपशील पोचत असतील असे नव्हे. किंबहुना ते पोचले नाहीत तरच बरे असतात. कार्टूनच्या पातळीवरच त्यांचे आकलन राहिले तर अधिकच बरे असते.

एकीकडे मुसलमान नावाच्या माणसाला कधीही पाहिलेले नसावे वा त्याच्याशी कधीही संबंध नसावा…. दुसरीकडे मुसलमान हा मागास, शत्रू, खलनायक इत्यादी सर्व काही असल्याचे येता जाता ऐकायला व पाहायला मिळावे…

यामुळे ते ऐकणाऱ्या-पाहणाऱ्याचे काय होईल याची कल्पना कोणालाही करता येईल.

पुण्यातले एक जुने उदाहरण आठवले. 1984-85 च्या आसपास अयोध्येत राममंदिरासाठी विटा जमा करण्याचा उद्योग विश्व हिंदू परिषदेने नुकताच सुरू केला होता.

पुण्याच्या कॉलेजांमधील तरुण त्यात सामील होऊ लागले होते. या कार्यक्रमांमध्ये सर्रास मुसलमानांविरोधात विष ओकले जात असे. पण त्यात सहभागी होणाऱ्यांपैकी बहुसंख्यांचे आयुष्य सदाशिव,नारायण, शनिवार पेठेच्या पलिकडे गेले नव्हते. त्यांचा कधी कोणा मुसलमानाशी असा वा तसा संबंध आल्याची शक्यता देखील नव्हती.

सर परशुरामभाऊ नावाचे प्रसिध्द कॉलेज आहे. त्यात मुस्लिम सोडाच ब्राह्मणेतर मुलेसुध्दा कमी संख्येने होती. ज्या सदाशिवरावभाऊच्या नावाच्या पेठेत ते होते तो निदान पानपतावर गेला होता. पण ही मुले स्वारगेटच्या पलिकडे घोरपडी पेठेत सुध्दा कधी गेली असण्याची शक्यता नव्हती. तरीही मुसलमानांविरुध्द त्यांची मते मात्र अत्यंत ठाम होती.

विशिष्ट प्रकाराने केल्या गेलेल्या प्रचाराचा हा परिणाम होता. नंतर यांच्यातील काही जण अयोध्येत मशीद पाडायच्या वेळेस चीअरबॉईज म्हणून गेले असे म्हणतात.  त्यातूनच पुढे देश पेटला. कायमची जखम झाली.

सध्या माझ्या डोळ्यापुढे असलेल्या शाळेतील मुलांबाबतीत पुन्हा हे घडते आहे.

असेही म्हणता येईल की, मुंबईतील बहुसंख्य मुलांच्या बाबत हे घडत आहे.

किंबहुना, महाराष्ट्र आणि देशातील असंख्य शाळां-कॉलेजांमधील मुलांबाबतही बहुधा हे घडते आहे.

किंबहुना, शाळेच्या बाहेर असलेल्या बहुसंख्य लोकांबाबतही हेच घडते आहे. अतिशियोक्ती करून बोलायचे तर असेही म्हणता येईल की भारतीय समाजात लैंगिक गोष्टींचे ज्ञान मुलांना जसे सांगोवांगीच्या गोष्टीतून, चोरीछुप्या पध्दतीने वा अतिरंजित स्वरुपात मिळते त्याच आडवळणी आणि विकृत रीतीने मुसलमान या विषयाबाबत बहुसंख्य हिंदूंची माहिती आणि समज घडत जाते. (त्यातून बचावतात ते सुदैवी.)

किंबहुना, असेही म्हणता येईल की, मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालावी असे म्हणणाऱ्या ट्रम्पला उचलून धरणारे सुजाण अमेरिकी आणि बोरीवलीतल्या शाळेतील अजाण मुले यांच्यात काहीच फरक नसतो.

खैर, अमेरिकेतले तूर्तास बाजूला ठेवू. पण आपल्या देशातील लोकांची समज आपल्याला सुधारून घेता येणे शक्य आहे.

पूर्ण देशाचेही जाऊद्या. सध्या महाराष्ट्रापुरते बोलू. या राज्यातील चिपळूण, कोल्हापूर, धुळे, परभणी किंवा अमरावती अशा विविध ठिकाणच्या मुस्लिमांची सध्याची स्थिती काय आहे, त्यांच्यातल्या तरुण, मुले-मुली, महिला, शेतकरी, कारागीर इत्यादींचे मानस काय आहे, त्यांचा काय शिकण्याकडे अधिक कल आहे याचे दर्शन आज कोणत्याही माध्यमांमधून आज घडत नाही.

तलाक, मुस्लिम आरक्षण किंवा अयोध्येचा प्रश्न निर्माण झाला की, शहरातील मंडळी पटापट आपापल्या भूमिका घेऊन मोकळे होतात. पण या प्रश्नावर गावागावातील मुस्लिमांचे म्हणणे काय आहे हे पुढे येत नाही.

गोहत्या बंदीच्या प्रश्नाबाबत मालेगाव किंवा अकोल्यात जाऊन मुस्लिमांसोबतच्या चर्चेचा कार्यक्रम करावा असे आपल्या मराठी वाहिन्यांना वाटत नाही. तशी गरज त्यांना जाणवत नाही.

उर्दू भाषा, मदरसे इत्यादीबाबत जागोजागची स्थिती काय आहे याबाबत क्वचितच वृत्तांकन होते.

नवीन आर्थिक धोरण, आयटी क्रांती, भाजपचे सत्तेत येणे यांचा मुस्लिम समाजावर काय परिणाम झाला आहे याबाबत एकही लेख कोणी लिहित नाही वा तशी बातमी टीव्हीवर दिसत नाही.

आपली नाटके, सिनेमे, साहित्य, मालिका इत्यादींमध्ये मुस्लिम या घटकाला आज जवळपास शून्य स्थान आहे. मोदींच्या आगमनानंतर इथल्या मुस्लिमांना प्रचंड मोठा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक न्यूनगंड यावा अशी स्थिती आहे. किंबहुना, भाजपची तशीच इच्छा आहे. या अवस्थेची पुसटशी छायादेखील आपल्या माध्यमांमधील चर्चा किंवा कलाकृती इत्यादींमध्ये दिसत नाही.

उत्तर प्रदेशातील रोजचे थैमान आणि फुत्कार यामुळे इथल्या मुस्लिम तरुण-तरुणींची स्थिती अत्यंत बिकट होत असली पाहिजे. त्यांच्या दैनंदिन झगड्यांचे प्रतिबिंब आपल्या समाजव्यवहारांमध्ये कुठेच पडताना दिसत नाही. हे बदलण्याची गरज आहे.

त्यासाठी वर जे जे होत नाही असे म्हटले ते ते करण्याची गरज आहे.

माध्यमे, विविध संघटना आणि मुस्लिम तरुण तरुणीं यांनी ते केले पाहिजे. नव्हे ती त्यांची जबाबदारी आहे.

राजेंद्र साठे
लेखक

राजेंद्र साठे

लेखक ज्येष्ठ पत्रकार असून विविध वृत्तवाहिन्या तसेच वृत्तपत्रातून त्यांनी काम केले आहे.