समाजवादी साथी फॅसिझम दिसता खाती माती असं म्हणणं हे अर्धसत्य आहे कारण प्रश्न केवळ फॅसिझमविरोधी लढाईत दगा देण्याचाच नाही. संघाच्या फॅसिझमला मुख्य प्रवाहात आणण्याचं समाजवाद्यांचे योगदान वादातीत आहे. आचार्य नरेंद्र देव यांच्यासारख्या थोर दार्शनिक नेत्याचा आणि नंतरच्या टप्प्यावर मधू लिमयेंचा अपवाद वगळता समाजवादी पक्ष /आंदोलनाला वैचारिक राजकीय दिशा देणाऱ्या नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फॅसिस्ट रूप कितपत कळले होते, आणि कळलेच तर त्याचा धोका कळला होता का, असा प्रश्नच पडण्यासारखा त्यांचा इतिहास राहिला आहे. “संघ फॅसिस्ट असेल तर ,मीही फॅसिस्ट आहे’’, असे उद्गार काढून संघ फॅसिस्ट नसल्याचे सगळ्यात मोठे सर्टिफिकेट देणारे जयप्रकाश नारायण होते, हे विसरता येणार नाही. आणीबाणीच्या विरोधात काहीही कृती न केलेल्या -तुरूंगातून इंदिरा गांधींना माफीनामे लिहून पाठवणाऱ्या संघ -जनसंघीयांना जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्रीय सत्तेपर्यंत घेऊन जाणारे समाजवादीच होते. संघ बदलतोय –संघ बदलतोय असा धोशा लावणाऱ्यांमध्ये खुद्द एसेम जोशी होते आणि राम बापटांसारखे समाजवाद्यांचे `मार्गदर्शक विचारवंत’ राष्ट्रकार्यात संघाची भूमिका काय असावी, यावर विस्तृत लेखही लिहीत होते.
नचिकेत कुलकर्णी
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देऊन नितीशकुमारांनी पुन्हा एकदा समाजवाद्यांच्या अवसानघातकीपणाचा दाखला दिला आहे. संघ-भाजपविरोधातील लढाईमध्ये नितीशकुमार हे आयत्या वेळी दगा देणारे बेभरवशाचे साथी आहेत आणि कुठच्याही क्षणी ते संघाच्या मांडीवर बसायला तयार होऊ शकतात हे उघड आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण जवळजवळ २० वर्ष नितीशकुमार आधी समता पक्ष आणि नंतर जनता दल युनायटेड हे त्यांच्यासोबतच होते , आणि जद (यु) चे प्रवक्ते आणि खासदार के. सी. त्यागी यांच्या अलीकडच्या विधानावरून तर त्यांना भाजपसोबतच्या सुखाच्या दिवसांच्या आठवणींचा उमाळा येतोय अशीच स्थिती दिसते.
अलीकडेच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशात लालूप्रसादांचा वाटा लक्षणीय किंबहुना निर्णायक होता त्यामुळे २०१९ मध्ये आता विरोधी पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांखेरीज कोणीच नाही असं वातावरण जरी दिसत असलं तरी ते सपशेल फसवं होत . मुळात ‘मोदी नकोत पण आडवाणी चालतील ‘ असा पवित्रा घेऊन भाजपची साथ सोडणारे संघ विरोधी भूमिकेवर कितपत ठाम राहणार हा प्रश्न होताच. मोदी नकोत असा आग्रह धरणारे नितीश कुमार २००२ च्या गुजरात हत्याकांडानंतरही वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिलेच तेंव्हा सांप्रदायिक-हिंदुत्ववादी फॅसिझमला विरोध हा त्यांच्यासाठी अग्रक्रमाचा मुद्दा नव्हता हे देखील ध्यानात घेतलं पाहिजे. नितीशकुमारांचा एक पाय भाजपच्या रिंगणात आहे आणि ते उद्या भाजपसोबत जाऊ शकतात याचे स्पष्ट संकेत देण्यापलीकडे एकंदरच समाजवादी साथी फॅसिझमविरोधी लढाईत माती खाण्यात पटाईत असल्याचे, ठराविक काळाने पुन्हा पुन्हा दिसणारे दृश्य पुन्हा बघायला मिळत आहे.
समाजवादी साथी फॅसिझम दिसता खाती माती असं म्हणणं हे अर्धसत्य आहे कारण प्रश्न केवळ फॅसिझमविरोधी लढाईत दगा देण्याचाच नाही. संघाच्या फॅसिझमला मुख्य प्रवाहात आणण्याचं समाजवाद्यांचे योगदान वादातीत आहे. आचार्य नरेंद्र देव यांच्यासारख्या थोर दार्शनिक नेत्याचा आणि नंतरच्या टप्प्यावर मधू लिमयेंचा अपवाद वगळता समाजवादी पक्ष /आंदोलनाला वैचारिक राजकीय दिशा देणाऱ्या नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फॅसिस्ट रूप कितपत कळले होते, आणि कळलेच तर त्याचा धोका कळला होता का, असा प्रश्नच पडण्यासारखा त्यांचा इतिहास राहिला आहे. “संघ फॅसिस्ट असेल तर ,मीही फॅसिस्ट आहे’’, असे उद्गार काढून संघ फॅसिस्ट नसल्याचे सगळ्यात मोठे सर्टिफिकेट देणारे जयप्रकाश नारायण होते, हे विसरता येणार नाही. आणीबाणीच्या विरोधात काहीही कृती न केलेल्या -तुरूंगातून इंदिरा गांधींना माफीनामे लिहून पाठवणाऱ्या संघ -जनसंघीयांना जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्रीय सत्तेपर्यंत घेऊन जाणारे समाजवादीच होते. संघ बदलतोय –संघ बदलतोय असा धोशा लावणाऱ्यांमध्ये खुद्द एसेम जोशी होते आणि राम बापटांसारखे समाजवाद्यांचे `मार्गदर्शक विचारवंत’ राष्ट्रकार्यात संघाची भूमिका काय असावी, यावर विस्तृत लेखही लिहीत होते.

गांधींजींच्या खुनाशी संबंधित असल्याचा डाग असलेल्या संघावर आपली स्वातंत्र्यलढ्यात कमावलेली पुंजी ओवाळून टाकून त्यांना समाजमान्यता मिळवून देण्यात जेपी-एसेमसारख्यांना कोणत्या स्वार्थत्यागाची अनुभूती यातून मिळाली हे कळायला मार्ग नाही. पण समाजवाद्यांच्या राजकीय समजेची दिवाळखोरी मात्र त्यातून लख्ख दिसून आली. अर्थात संघ जनसंघाला राजकीय मुख्यप्रवाहात आणण्याचं आणि त्यांची डागाळली छबी उजळवण्याचं काम सुरु केलं होतं ते राममनोहर लोहियांच्या बिगर काँग्रेसवादाने! स्वतंत्र भारताच्या इतिहासात संघाला राजकीय सत्तेत वाटा मिळवून दिला तो १९६७ च्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या संयुक्त विधायक दलाच्या लोहियाप्रणित प्रयोगाने. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतीय राजकारणातील विभाजनरेषा – faultline ही व्यापक अर्थाने उदारमतवादी -पुरोगामी -धर्मनिरपेक्ष शक्ती विरूद्ध धर्मांध सांप्रदायिक शक्ती अशी होती – राजकीय स्पर्धा /चर्चा ही डावीकडे झुकलेले उदारमतवादी (नेहरू) आणि कम्युनिस्ट सोशालिस्ट यांच्यामध्ये होती – गैरकाँग्रेसवाद प्रचलित झाल्यामुळे निव्वळ काँग्रेसविरोध एवढ्याच कारणासाठी सोबत घेतलेल्या संघ आणि जनसंघाला विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळू लागली आणि राजकीय स्पर्धा -चर्चेची faultline बदलू लागली. असल्या सरमिसळीमधून लोहियांसारख्या रोमँटिक निस्सीम बंडखोर नेत्याला दीनदयाळ उपाध्यायांच्या विचारात देशभक्तीचा साक्षात्कार व्हावा -आणि सहकार्याच्या शक्यता दिसाव्यात हे समाजवाद्यांच्या सर्व दोष आणि अपुरेपणावर लख्ख प्रकाश टाकणारे नमुनेदार उदाहरण आहे.
भारतीय समाजातील मुख्य अंतर्विरोध कुठले , राष्ट्राच्या राजकीय जडणघडणीवर त्यांचा काय परिणाम होतो आणि समता-लोकशाहीची आधुनिक मूल्य रुजवण्यासाठी ह्या जडणघडणीमध्ये आपला सहभाग कशा प्रकारचा असायला हवा, ह्याबद्दल निश्चित आकलनच नसल्यामुळे समाजवाद्यांना स्वतःच्या राजकीय उद्दिष्टाबद्दल मुळात स्पष्टता नव्हतीच. ह्या प्रश्नांचे आकलन होण्यासाठीची आणि कृतीला मार्गदर्शन करणारी तात्त्विक बैठक इतिहास आणि समाजाच्या शास्त्रीय विश्लेषणातून घडवली जाते- अशा विश्लेषणाचे प्रभावी हत्यार म्हणजे मार्क्सवाद! ज्याचे समाजवाद्यांना कायमच वावडे. ह्या अॅलर्जीचे मूळ कारण अगम्य आहे. कदाचित न्यूनगंड असेल. खरं तर नरेंद्र देवांचं लिखाण हा मार्क्सवादी विश्लेषणाचा उत्तम नमुनाच आहे ,पण लोहिया, जेपी आणि मध्येच अचानक मिनू मसानी यांच्यापलीकडे समाजवाद्यांची गाडी जात नसल्यामुळे ते आपल्याच संस्थापक नेत्याच्या विचारला पारखे झालेत. आपल्याला मार्क्स कळला नाही, मार्क्सविचारातले काही पैलू आपण वाचलेच नाहीत असं कबूल करण्याऐवजी समाजवाद्यांचे वसंत पळशीकरांसारखे मार्गदर्शक विचारवंत ‘मार्क्सला हे कळलेच नाही ‘ वगैरे बिनधास्त विधाने सर्रास करतात. मार्क्सवादाचं वावडं आणि दुसरी कुठली विश्लेषण चौकट उभी करता आली नाही, त्यामुळे युरोपीय उजवे- conservative विचारवंत – शीतयुद्धात अमेरिकेची बाजू लढवणारे मुक्त विचारवंत आणि भारतीय पुनरुज्जीवनवादी विचारातले पैलू यांची बेशिस्त उसनवारी करून आपली तात्त्विक भूमिका मांडण्यात समाजवाद्यांनी धन्यता मानली. समाजवादी ज्याला मूलभूत योगदान वगैरे मानतात ती लोहियांची इतिहासचक्र’ आणि समाजवाद, काळा – गोरा’ हि दोन पुस्तकं उदाहरणादाखल बघण्यासारखी आहेत. यात प्रगतीच्या संकल्पनेवर प्रश्न उठवण्यापासून ते भांडवलशाही आणि कम्युनिझम एकाच पाश्चात्य संस्कृतीची अपत्ये आहेत, त्यामुळे ती भारताला लागू पडणारी नाहीत, अशा संघीय विचारधारेच्या धर्तीचे विचार आहेत. मग दीनदयाळांच्या एकात्म मानवतावादाशी अशा विचाराची दोस्ती का नाही जमणार ? अशा ठिगळकामातल्या फटींमधून प्रतिगामी धारणा, समजुती सहज शिरकाव करू शकतात आणि मग जनसंघ देशभक्त आहे इथपासून ते संघ हा फॅसिस्ट नाहीच तर हुकूमशाहीविरोधी लढ्यातील सच्चा साथी असल्याचे साक्षात्कार होऊ शकतात.
ब्रिटीश राजकीय तत्वज्ञ जॉन लॉक म्हणतो त्याप्रमाणे मूर्ख माणूस योग्य गृहीतकांवरूनही योग्य निष्कर्ष काढू शकत नाही मात्र वेडा माणूस मोठ्या निष्ठेने चुकीच्या गृहीतकांवरून निष्कर्ष काढत राहतो. समाजवादी ह्या दोन्ही अवस्थांमध्ये हेलकावे खात राहिले असं म्हणता येईल का ?
वर उल्लेख केलेल्या प्राथमिक महत्वाच्या प्रश्नांचा विचारच न केल्यामुळे किंवा चुकीची उत्तरं शोधल्यामुळे समाजवाद्यांच्या राजकीय व्यवहाराचा आधार राहिला तो एका बाजूला पराकोटीचा नेहरूविरोध आणि दुसऱ्या बाजूला कम्युनिस्टांचा विलक्षण द्वेष. भारत – चीन सीमा वादाच्या आणि संघर्षाच्या काळात युद्धज्वर आणि राष्ट्रवादी उन्माद वाढवण्यात समाजवाद्यांचा खासकरून लोहियावाद्यांचा मोठा वाटा राहिला. त्यांच्यावर कळतनकळत बसलेल्या या उजव्या प्रतिगामी विचारांचा पगडा त्याला कारणीभूत होता आणि त्याला जोड होती ती नेहरूविरोधाची. आजही अशा युद्धखोर उन्मादाविरोधात ठाम भूमिका घ्यायला समाजवादी कचरतातच. किंबहुना मुलायम सिंग आणि नितीशकुमारांसारखे समाजवादी त्याला धार्जिणी भूमिकाच घेताना दिसतात. भारत पाकिस्तान संबंध तथाकथित सर्जिकल स्ट्राईक ,अण्वस्त्रचाचण्या अशा प्रश्नांबद्दलच्या त्यांच्या किंवा एकंदरच समाजवाद्यांच्या भूमिका बघाव्यात. विकास आणि राष्ट्रनिर्मितीची militarist किंवा बल केंद्रित भूमिका मांडणाऱ्या अब्दुल कलामांचीही समाजवाद्यांमध्ये वाहवा होत असते.
असल्या भूमिका फॅसिस्टांना पूरक-पोषक कशा ठरतात ते हे वेगळं सांगायची गरज नाही. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात १९६८ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवाद्यांनी सेनेशी युती केली त्यात कम्युनिस्टद्वेषाचा भाग उघडच होता. कम्युनिस्टांच्या द्वेषापायी शिवसेनेसारख्या फॅसिस्ट प्रवृत्तीला आपण शिरजोर करतोय याचं सोयरसुतक समाजवाद्यांनी बाळगलं नाही आणि एकंदरीतच सेनेशी थेट संघर्षाची भूमिका अभावानेच घेतली. या कम्युनिस्टद्वेषाला आंतरराष्ट्रीय परिमाणही होतं आणि ते नेहरूविरोधाचंही कारण असावं असं मानायला जागा आहे. जेपी-लोहियांच्या आंतराराष्ट्रीय प्रश्नांवरच्या भूमिका अमेरिकन-ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या बाजूने झुकणाऱ्या होत्या. उघडपणे किंवा हेतुपुरस्सर जरी नाही तरी कमालीच्या सोव्हिएत विरोधामुळे परिणाम तोच साधला जायचा. पुन्हा इथेही अपवाद नरेंद्र देव आणि मधू लिमयेंचाच – (ह्या दोघांचाही मार्क्सवादावर पकड होती हा योगायोग खचितच नसावा ) यामुळे त्यांचे नैसर्गिक मित्र राहिले ते साम्राज्यवादधार्जिणे प्रतिगामी आणि सापेक्षदृष्ट्या का होईना साम्राज्यवादविरोधी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला पराभूत करण्यासाठीच्या बड्या आघाडीत संघाच्या मांडीला मांडी लावून समाजवादी बसले. नेहरू आणि काँग्रेसच्या जनविरोधी धोरणाविरोधात डावा पर्याय उभा करण्याचा मार्ग समाजवाद्यांना कधीच धडपणे स्वीकारता आला नाही. तो त्यांच्या या कम्युनिस्ट आणि सोविएत द्वेषापोटी. भारतातले कम्युनिस्ट किंवा सोविएत युनियन यांना निर्दोष ठरवण्याच्या त्यांच्या मर्यादा नाकारण्याचा अजिबात हेतू नाही. त्याची चिकित्सा व्हायलाच हवी आणि होतही असते. पण फॅसिझमला कसून विरोध करायच्या ठाम भूमिकेपासून ते कधी दूर र गेले नाहीत हा इतिहास आहे.
गैरकाँग्रेसवादाने पछाडलेले समाजवादी मग तात्कालिक राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघ जनसंघाला बरोबर घेऊन त्यांची ताकद वाढवत राहिले आणि तर्कट लढवून त्याचं समर्थनही करत राहिले. २००२ च्या गुजरात हत्याकांडाच्या वेळी समाजवाद्यांचे नेते – साथी -मित्र ‘ जॉर्ज फर्नांडीस ज्या हिरीरीने सरकारच्या बाजूने उतरले होते ती या तत्त्वशून्य आणि निलाजऱ्या तर्कटाची परिसीमाच होती .
हा सगळा इतिहास असतानाही आणि आज राजकीय ताकद नगण्य असतानाही शहाणपणाचे फुकटचे धडे देत राहून टीकाटिप्पणी करत राहण्याचा अनावर सोस समाजवाद्यांना असतोच. समाजवाद्यांची स्वतःची ताकद नसतानाही निवडून आणले जाणारे आमदार आणि आता तर जनता दल युनायटेडचे प्रदेशाध्यक्ष असलेले कपिल पाटील यांनी लिहिलेला लेख ह्या कमावलेल्या शहाजोगपणाचाच नमुना आहे. कोविंद यांचं समर्थन करण्याच्या निर्णयाची पाठराखण करण्यासाठी त्यांनी ज्या सबबी दिल्या आहेत त्या हास्यास्पद आहेतच पण थेट गांधी आणि आंबेडकरांना वेठीस धरून आपल्या संधीसाधूपणाला मुलामा द्यायचा त्यांचा प्रयत्न समाजवाद्यांचे व्यवच्छेदक लक्षण किती खालपर्यंतच्या त्यांच्या समर्थकांमध्ये रुजलं आहे, हे दाखवणारा आहे. कोविंद हे तसे काही संघाचे नाहीत आणि त्यांनी किमान दाखवण्यापुरतं बाबासाहेबांचं नाव घेतलं असला थिल्लर युक्तिवाद करून त्यांनी आजही संघ-भाजपच्या फॅसिझमविरोधी ठाम भूमिका घ्यायचं सोडून काँग्रेसची मापं काढायचा जो काही निसरडा प्रयत्न केला आहे तो चकवे लावण्याचा जुनाच समाजवादी घालमोडेपणा आहे. प्रत्यक्ष राजकीय सामाजिक व्यवहारात शून्य हस्तक्षेप असलेले काही रिकामटेकडे समाजवादी ‘विचारवंत’ येताजाता संघ आणि कम्युनिस्टांना एका मापात तोलून चकवा लावणायचे-गोंधळ निर्माण करण्याचे आणि संघविरोधाची धार बोथट करण्याचे चाळे करीत असतातच. काँग्रेसविरोध कम्युनिस्टविरोध यात चर्चाविश्व गुंतवून ठेवून संघाला मोकळे रान मिळते याचे त्यांना भान नाही आणि असलेच तर फिकीर बिलकूलच नाही.
झुंडशाही आणि मॉब लिंचिंग -हत्यासत्राच्या रूपाने समोर ठाकलेल्या फॅसिस्ट संकटाविरोधात- संघाच्या मोदी सरकारविरोधात अभूतपूर्व एकजुटीची गरज असताना चिकित्सेच्या नावाखाली संभ्रम वाढवण्याच्या समाजवादी चाळ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. फॅसिझमला प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष मदत करण्याच्या त्यांच्या परंपरेलाच ते जागत आहेत हे ओळखले पाहिजे आणि त्याचा हिशोबही चोख ठेवला पाहिजे!



