मानवाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी चार्लस डार्विन(1808-1882) यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावे लागेल.त्यांच्या वाट्याला सुमारे 73 वर्षाचे आयुष्य आले.वयाच्या 22 व्या वर्षी सुमारे पाच वर्षे बोटीतून जगाची सफर करून त्यांनी पक्षी,जलचर,वनस्पती,प्राणी इत्यादी सजीवांचा अभ्यास केला,पुढे त्यावरती मिळवलेल्या डाटावर(स्रोत) वीस वर्षे काम करून 1859 साली त्यांनी आपला on the origin of species हा अभिजात ग्रंथ प्रकाशित केला.सुमारे 25 वर्ष संशोधन करून डार्विनने थेअरी मांडली,डार्विनचे संशोधन म्हणजे सत्यपाल सिंहासारखे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा प्रकारचे नाही.पळी पंचांग आणि भटी भेजा घेऊन डार्विनने पंचगव्य सेवन करून संशोधन केले नाही.तर शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून त्यांनी मानवी उतक्रान्ती बाबत सिद्धांत मांडला.
कोणताही सजीव स्वतंत्रपणे निर्माण झालेला नाही, तर ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे. Geology च्या थेअरीनुसार सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली.सुरुवातीला तप्त वायूचा असणारा गोळा पर्जन्य वृष्टीमुळे थंड झाला,त्यावरती पाणी साठले.सुमारे 350 कोटी वर्षांपूर्वी एकपेशीय सजीव निर्माण झाला.ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.लाखो वर्षांनी बहुपेशीय जलचर,पक्षी,प्राणी,वनस्पती निर्माण झाले.सुमारे 5 कोटी वर्षांपूर्वी वानरसदृश्य प्राणी निर्माण झाला. सुमारे 30 ते 40 लाख वर्षाच्या दरम्यान अस्ट्रोलोपीथिकस हा मानवसदृश्य प्राणी तयार झाला.याचा जबडा मोठा होता,चार पायावर चालत होता,त्यानंतर होमो हेबिलास हा हातांचा वापर करणारा प्राणी निर्माण झाला.प्रत्येक स्टेजला तो निसर्गानुसार स्वतःमध्ये बदल करून घेतोय(
adaption) यालाच डार्विन survival of fittest म्हणतात.ज्या प्रजातीने निसर्गानुसार स्वतः मध्ये बदल करून घेतला, तिच प्रजाती जिवंत राहिली,बाकी
प्रजाती नष्ट झाल्या.
होमो हेबिलास नंतर होमो इरेक्टस हा मानव आला.पाठीचा ताठ कणा हे त्याचे वैशिष्ट्ये होय.वणव्याच्या ज्वाला त्याला अग्नीची जाणीव करून
गेल्या.तो अन्न भाजून खाऊ लागला,त्यामुळे त्याचा जबडा लहान झाला.त्यानंतर निअंडरथल ही स्टेज आहे.त्यानंतर होमो सॅपीयन ही स्टेज आहे.याच टप्प्यात तो दगडी हत्यार वापरू लागला, म्हणजे हा काळ सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचा मानला जातो,ऐतिहासिक भाषेत या काळाला स्टोन एज(stone age) म्हणतात.याच मानवाने शेतीचा,घर बांधण्याचा शोध लावला.याला गॉर्डन चाईल्ड नावाचा महान आर्किओलॉजिस्ट क्रान्तीचे युग म्हणतो.
यानंतरची म्हणजे आजची स्टेज आहे होमो सॅपीयन सॅपीयन याचा अर्थ आहे सुंदर आणि बुद्धिमान मानव.मानवशास्त्राने(Anthropology) याबाबत
शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केलेला आहे.पण मानवाचा विकास संपलेला नाही, असे मानवशास्त्रज्ञ पुराव्यानुसार सांगतात.एक लाख वर्षांनी आजच्या सारखा मानव नसेल,केस नसतील,नडगीचे एक हाड नसेल,पायाचे खालचे तळवे नसतील,याबाबतचे कल्पनाचित्र ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी ‘हिंदू’त मांडलेले आहे.
माकडापासून मानव झाला, असे डार्विन देखील सांगत नाहीत, तर natural selection आणि survival of fittest हे दोन महत्वाचे सिद्धांत डार्विन
यांनी मांडलेले आहेत.कोणताही एखादा सजीव स्वतंत्रपणे तयार झालेला नाही,तर सर्व सजीव उतक्रान्त होत आलेले आहेत.आजचा मानव आणि माकड हे मूळ एकाच प्रजातीपासून निर्माण झालेले असावेत,माकडापासून मानव नव्हे,असे अंथ्रोपोलॉजिस्ट सांगतात.सत्यपालसिंह मात्र मानवलीला करण्याऐवजी मर्कटलीला करतात, हे सगळे वैदिकपरंपरेला प्रमाण मानल्याचे परिणाम आहेत.असे जर शिक्षणमंत्री आपल्या देशाला लाभले असतील तर आपल्या देशाचे भवितव्य अंधकारमय आहे.
डार्विनचा सिद्धांत परिपूर्ण नाही. तो अगदी चुकीचाही ठरू शकतो. उत्क्रांती खरोखरचं घडली का ? तर घडली. कारण आज जगभरात सापडणाऱ्या
जीवाष्मां वरून करोडो वर्षांपूर्वी या ग्रहावर आज आढळतात त्याहून वेगळ्याच प्रजाती नांदत होत्या. मग उत्क्रांती नेमकी कशी घडली ? डार्विन म्हणतात त्यानुसार सजीवांच्या रचनेत अपघाताने अचानक होणारे बदल - म्युटेशन्स - मुळे एकाच प्रजातीतील काही निवडक नमुने इतरांपेक्षा जीवनाच्या संघर्षात सरस ठरू लागले, त्या प्रजातीत या निवडक नमुन्यांची अपत्ये, मात्या पित्यांचे गुणधर्म घेऊन जन्मास आली आणि काळाच्या ओघात, ह्या नवीन गुणधर्म असलेल्या पिढ्या त्याच प्रजातीतील इतर प्राण्यांच्या तुलनेत प्रबळ ठरून त्यांची संख्या वाढत राहिली. इतर नष्ट होऊन गेले.
हा सिद्धांत चुकीचा असू शकेल, विज्ञान जगतात आजही या सिद्धांताचे खंडन करणारे नवीन नवीन संशोधन होतच आहे, जेव्हा पुरेसे पुरावे हाती येतील आणि उत्क्रांती नेमकी कशी घडून आली याचे स्पष्टीकरण मिळेल, तेव्हा डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरला, तरी त्याने कोणासहि वाईट वाटण्याचे काही कारण नाही. परंतु डार्विनचा सिद्धांत चुकीचा आहे कारण ब्रम्हाच्या मुखातून ब्राम्हण बाहेर पडले, हातातून क्षत्रिय, पायातून शूद्र वैगेरे भाकड कथा डार्विनचा प्रतिवाद होऊ शकत नाहीत. जिवाच्या उत्पत्तीचा, या ग्रहावरील जीवसृष्टीच्या खेळाचा वेध घेण्यात डार्विनचे योगदान हा एक मैलाचा दगडं बनून राहिला आहे.
उद्या अगदी स्पष्ट पुराव्यानिशी डार्विनचा सिद्धांत फेटाळला गेला, तरी तो विज्ञानाच्या पुस्तकांतून वगळून टाकणे हा वेडाचार असेल. कारण सैद्धांतिक
मांडणी कशी करावी, विज्ञाननिष्ठ विचार कसा करावा हे शिकण्यासाठी डार्विनची मांडणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे. स्टीफन हॉकिन्सचा प्रसरण पावणाऱ्या विश्वाचा सिद्धांत जेंव्हा पुराव्यानिशी स्विकारला गेला, तेव्हा जयंत नारळीकर व फ्रेड हॉईलचा स्थिर विश्वाचा सिद्धांत रद्द ठरला, त्यासाठी नारळीकरांच्या सिद्धांत आता विज्ञानाच्या पुस्तकांतून काढून टाका हि मागणी जेवढी मूर्खपणाची, त्याहून अधिक सत्यपालसिंहांचा डार्विन वरील रोष मूर्खपणाचा आहे.
सत्यपाल सिंह हे एकेकाळचे आय पी एस अधिकारी आहेत. देशातील सर्वोच्च प्रतीची सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा, मुलाखत पास झाले आहेत. या देशातील एवढा उच्चंविद्याविभूषित माणूस जर एवढा आचरट असेल, आणि अशा माणसाला खास निवडून मोदीसरकार शिक्षणमंत्री बनवित असेल, तर आपला प्रवास मध्ययुगाच्या दिशेने सुरु झाला आहे यात काही शंका नाही.



